Friday, August 9, 2013

सगळ्यात अवघड गड!

आमच्या दहावीच्या अभ्यास शिबिरात खूप छान छान व्याख्यानं झाली. एका संध्याकाळी व्याख्यानाला वेळ होता म्हणून आम्ही ५-६ जणी शाळेशेजारी आमच्या नेहमीच्या ठिकाणी गप्पा मारत उभ्या होतो. एक मध्यम वयाचे गृहस्थ तिथे सायकलवरून आले आणि त्यांनी काहीतरी विचारलं, बहुदा सायकल कुठे लावू की असंच काहीतरी. आम्ही त्यांना उत्तर दिलं आणि पुन्हा गप्पांत दंग झालो. आता आम्हाला काय माहिती की आपले आजचे प्रमुख पाहुणे सायकलवरून येणार आहेत म्हणून!
ते प्रमुख पाहुणे होते प्रा.प्र. के. घाणेकर! त्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात केलेल्या भटकंतीवर गप्पामारल्या. व्याख्यान खुपच रंगलं. प्रश्नोत्तरांच्या वेळी त्यांना कुणीतरी विचारलं, " सर, तुम्ही इतके गड किल्ले सर केले आहेत. तर त्यातला सगळ्यात अवघड किल्ला कुठला होता?" त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर अजून माझ्या मनात रुतून बसलं आहे. ते म्हणाले, "खरं सांगू का? सगळ्यांत अवघड गड असतो तो उंबरठा गड! म्हणजे तुमच्या घराचा उंबरठा! एकदा तुम्ही तो पार करून बाहेर पडलात ना की मग कोणताही गड अवघड रहात नाही!" त्यावेळी ते उत्तर ऐकून मज्जा वाटली होती. पण आता जाणवतं की हे किती खरं आहे ते!
आता वाटतं की तो घराचा उंबरठा देखील प्रतीकच असतो. ओलांडण्यासाठी सर्वात अवघड असतो तो मनाचा उंबरठा! आपले पूर्वानुभव, इतरांचे सल्ले आणि समाज रुढी यांनी बनलेला. हे उंबरठे आपल्या मनात आपणच आपल्या नकळत उभारत असतो. ते जाणीवपूर्वक टाळलं पाहिजे. आणि तो मनाचा उंबरठा एकदा ओलांडला ना की मग पल्याडची न्यारी दुनिया आपली वाटच बघत असते!

Thursday, August 8, 2013

वादे वादे!

ह्या अनुभवाबद्दल मला बरेच दिवस लिहायचंच होतं. स्वतःची ठाम मते असलेली (opinionated) दोन माणसं जेव्हा संवाद साधतात तेव्हा काय होतं? मी स्वतः या कॅटॅगरीत मोडत असल्याने ह्या प्रसंगांचा मला बराच अनुभव आहे. या साऱ्या अनुभवांत काहीतरी समानता आहे हे मला जाणवत होतं पण ते नक्की काय हे उमजायला जरा वेळ लागला. तर हा शोध काय आहे ते मला सांगितलंच पाहिजे कारण तो इंटरेस्टिंग आहे आणि उपयोगीदेखील!
बरेचदा कसं असतं की कोणत्याही गोष्टीला दोन (वा अधिक) बाजू असतात आणि कोणतीही एक बाजू संपूर्णपणे चूक किंवा बरोबर असत नाही. परिस्थितीप्रमाणे किंवा व्यक्तीसापेक्ष योग्य बाजू बदलत असते. किंवा बरेचदा तो एक choice असतो. म्हणजे कधी कधी  I could have gone either way but I could choose only one so I chose this इतका सोपा. पण समजा त्या निर्णयावर किंवा अशा एखादया subjective विषयावर (उदा. लिव्ह इन रिलेशनशिप) दोन opinionated व्यक्ती बोलू लागल्या की काय होतं? मी सांगते! त्यांचं फार कमी वेळा एकमत होतं! कारण जर एका व्यक्तीने एक बाजू उचलून धरली तर दुसऱ्या व्यक्तीला बरेचदा दुसरी बाजू उचलून धरण्याची खुमखुमी येते! (मला येते! खोटं का बोला!) दोन्ही बाजूंना आपापले pros and cons असतातच ! (बरेचसे मुद्दे दोघांना माहिती असले तरी) त्यामुळे थोडा काळ वाद होतो आणि गाडी एका नेहमीच्या वळणावर येऊन थांबते. आता depending on the situation and subject ह्यात बरीच variations होऊ शकतात पण pattern फारसा बदलत नाही.
'वादे वादे जायते तत्वबोध:' हे जरी खरं असलं तरी अनेक वेळा ह्या वादांतून वेळेच्या आणि उर्जेच्या अपव्ययाखेरीज काही हाती लागत नाही. बरेचदा हे वाद घालणाऱ्या व्यक्ती पुरेशा सुज्ञ आणि विचारी असतात त्यामुळे दुसरी बाजू त्यांनाही व्यवस्थित दिसत असतेच! (आणि जर कोणी एक डोळ्यावर झापडं बांधून वाद घालत असेल तर सारंच व्यर्थ आहे!). मात्र एकप्रकारचं killer instinct त्यांना वाद घालण्यापासून थांबवू शकत नाही!
ह्यात अजून एक इंटरेस्टिंग underlying प्रक्रिया असते! आपण पत्त्यांत challenge खेळतो तेव्हा जो शेवटी पत्ते लावतो त्याला पुढची उतारी मिळते! या वादांमध्येदेखील ते शेवटचं "और एक" प्रत्येकाला म्हणायचं असतं! To have the last word! जे थोडेफार माझ्या स्वभावात आहे. पण ही गोष्ट चांगली नसते!
वाद घालण्यात एक मजा असते आणि मला वाद घालायला आवडतं. पण  हा pattern लक्षात आल्यापासून काही गोष्टी मी स्वतःपुरत्या तरी follow करण्याचा प्रयत्न करते.
एक,  जरी वाद घालताना आपण एक बाजू मांडली असली तरी वाद संपल्यावर आणि मुख्य म्हणजे डोकं थंड झाल्यावर दुसऱ्याने मांडलेल्या बाजूचा पुन्हा विचार करून पहावा. बरेचदा काहीतरी चांगले हाती लागते!
दोन,  ह्या वादातून फारसे काही निष्पन्न होणार नसल्याचे लक्षात आले की let's agree to disagree म्हणून लगेच वाद मिटवून टाकावा! वेळ पडली तर सपशेल माघार घ्यावी! संबंधात उगीच कटुता येण्याचे chances कमी होतात.
ह्या वाद घालण्याच्या प्रोसेसकडे डोळसपणे पाहायला लागल्यापासून माझी वाद घालण्याची खुमखुमी थोडी कमी झाल्येय आणि (माझी आणि इतरांची) मन:शांती थोडीशी वाढल्येय यात वादच नाही!

Oh my God Moments!

हा माझा अगदी tried and tested अनुभव आहे. कोणत्याही मोठ्या महत्वाच्या गोष्टीत/प्रसंगात काहीतरी न्यून राहतेच (तीट लागल्यासारखे)! सर्व काही ठरल्याप्रमाणे जसे हवे तसे बिनचूक झाले आहे असे होतच नाही. प्रत्येक वेळी एखादी तीट लावण्यापुरती तरी एखादी OMG moment असतेच! त्या मोमेंट ची तीव्रता कमीजास्त असू शकते. ती जब वी मेट मधली रतलाम स्टेशनवर सुटलेल्या ट्रेनकडे आ वासून पाहणारी करीना आठवते? तशी तीव्र किंवा हातिच्चा! एवढंच राहिलं का! एवढी साधी! आत्तापर्यंत ह्या दोन्ही टोकाच्या आणि अधल्यामधल्या सर्व तीव्रतेच्या OMG moments अनुभवल्या आहेत. वाईट्ट वाईट्ट OMG moment म्हणजे एकदा एका फार महत्वाच्या प्रयोगात (ज्याचे निष्कर्ष काल मिळाले असते तर बर इतके urgent होते ) मी हवं असलेलं supernatent चक्क ओतून दिलं होतं!! त्यावेळी ही धरणी फाडून मला पोटात घेईल तर किती बरं असं वाटलं होतं!
आता तर मी अशा OMG moments ची वाटच बघत असते. ती मोमेंट एकदा येउन गेली की हायसं वाटतं मला. म्हणजे त्यावेळी व्हायची ती चूक/गडबड होऊन गेलेली असते. आता फक्त निस्तरणं आपल्या हातात असतं . अशावेळी मी पश्चाताप वै. करत बसत नाही. झालेली चूक निस्तरते आणि आपली थियरी कशी योग्य असं म्हणत स्वतःची पाठ थोपटते!

पुढच्यास ठेच मागचा शहाणा

खरंतर आपल्या म्हणी इतक्या चपखल असतात की त्यांच्या अचूकतेने थक्क व्हायला होतं. फार मोठा आशय किंवा सत्य अत्यंत नेमक्या शब्दात मांडलेलं असतं. उदा. नावडतीचे मीठ अळणी! पण एक म्हण आजकाल मला फार खटकू लागली आहे. ती म्हण आहे : पुढच्यास ठेच मागचा शहाणा. दुसऱ्याच्या ठेचेमुळे शहाणपण शिकलेला एकतरी माणूस दाखवा मला! एवढंच कशाला बरेचदा आपण स्वतःच्या चुकांतून देखील शिकत नहि. मग कशी बर तयार झाली ही म्हण!