Wednesday, October 7, 2009

एका गज़लेची गोष्ट!

स्थळ: मुलुंड वेळ: रात्रीची काळ: TYBSc

नुकतीच सुरु झालेली मुंबईतली एफ एम रेडीओ स्टेशन्स आणि त्यांनी लावलेली जुन्या हिंदी गाण्यांची अवीट गोडी! माझा made in china FM radio आणि स्वरांच्या राज्यातून स्वप्नांच्या राज्यात प्रवेश करणारी मी! कानात जगजीत सिंगांचा तलम मुलायम आवाज ऐकू येतो आणि निद्रेच्या दिशेला निघालेली माझी पावलं थबकतात.

मैं कैसे कहूं जानेमन तेरा दिल सुने मेरी बात|

ये आखोंकी स्याही ये होठोंका उजाला

यहीं है मेरे दिन रात|

"या ओळी लक्षात ठेवायच्या बर का! " मी मनाला बजावते आणि सुरांच्या साथीने झोपी जाते!

आधीच माझी स्मरणशक्ती दिव्य त्यात अर्धवट झोपेत ऐकलेल्या गज़लेच्या ओळी कुठून लक्षात राहायला! दिवस गेले, महिने गेले आणि ती गज़ल हळूहळू मनाच्या नजरेआड गेली.

पुन्हा अशीच एक रात्र.

स्थळ: खोपोली काळ: TYBSc बहुतेक जानेवारी महिना.

त्यावेळी मी दर शनिवार-रविवार खोपोलीला जायचे. ही आठवण मात्र माझ्या मनात काल घडल्या इतकी ताजी आहे. का, कसे माहिती नाही पण कधी कधी आपल्या मनात दोन अगदी भिन्न गोष्टींचे धागे एकाच आठवणी भोवती गुंफलेले असतात. एखादा वास आपल्याला स्थळ काळाच्या मर्यादा ओलांडून पार तिसरीकडेच घेऊन जातो ना तशी एखादी आठवण आपल्याला अनेक unrelated गोष्टी एकत्र आठवायला भाग पाडते. ( आता ह्याला विषयांतर म्हणू की प्रास्ताविक?)

असो..तर पुन्हा एकदा खोपोलीच्या घरातली ती रात्र. मी आपल्या उद्योगात दंग आई- बाबा त्यांच्या त्यांच्या. नेहमीप्रमाणे रात्रीचा रेडीओ चालू. अचानक कानावर त्याच गज़लेचे सूर! Recognize व्हायला दोन सेकंद जातात आणि मग माझी हातातलं काम सोडून कागद पेन शोधण्याची धावपळ! आयत्या वेळी कधीही सापडणाऱ्या दोन वस्तू म्हणजे चालणारं पेन आणि कोरा किंवा निदान पाठकोरा कागद! मी रेडीओ शेजारच्या Box मधून हाताला लागेल ते उपसत असते. शेवटी एक चालणारं पेन हाती लागतं. समोर कुठल्याशा तारखेचा पेपर पडलेला असतो तो उचलते आणि त्या गज़लेचा मुखडा खरडते. चला! आता मात्र ही गज़ल नक्की शोधायची! त्या आनंदात गज़लेचा मुखडा गुणगुणते. बाप रे! किती पसारा केलाय आपण! आता हे सगळं आवरलं पाहिजे नाहीतर आई उगीच चिडचिड करेल! Box मधल्या गोष्टी आत टाकताना हातात येतं एक earbuds चं उघडलेलं पाकीट...मीच आणलेलं....साधारण महिन्याभरापूर्वी....आजीसाठी...आजी....त्या पाकिटाकडे पाहताना "आता आजी नाही" ही क्रूर वास्तवाची जाणीव कुठेतरी खोल काळीज चिरत जाते आणि मी ढसाढसा रडायला लागते. जरा वेळाने आपोआप स्वत: शांत होते. एका हातात गज़लेच्या ओळी खरडलेला जुना पेपर...दुसऱ्या हातात earbuds चं पाकीट..आणि मनात कुठेतरी गज़लेचे सूर आणि आजीच्या आठवणी एकत्र दाटून आलेल्या….!

पिक्चर मध्ये दाखवतात ना तसा जाणारा काळ लिहिण्यातून दाखवता आला असता तर किती छान झालं असतं! त्या रात्रीनंतर जवळपास चार वर्षं सरली. मधल्या काळात गज़लेचा मुखडा माझ्या ओठांवर रुळला होता. मला जे जे संगीतप्रेमी/गज़लप्रेमी लोक भेटले त्यांना मी माझ्या 'सुमधुर आवाजात या दोन ओळी ऐकवून "आपण यांना पाहिलंत का?" च्या चालीवर या गज़लेची चौकशी करत होते! ही जगजीत सिंग यांनी गायलेली गज़ल आहे आणि कधी काळी मुंबईच्या रेडीओ स्टेशन्स वर अधूनमधून लागायची यापलीकडे माझ्याकडे काहीही माहिती नव्हती.

आता पुन्हा एक रात्र! स्थळ: ऑस्टिन वेळ: रविवार रात्र

अतिशय आळसात घालवलेला रविवारचा दिवस संपताना लागणारी हुरहूर आणि आणि at the same time ठरवलेली कामं केल्याबद्दल छळणारा आपला conscience अशा मूड मध्ये मी! laptop पुढ्यात घेऊन इकडच्या तिकडच्या साईट्स बघतेय. कशी काय कोण जाणे पण मी cooltoad वर गज़ल च्या catagory मध्ये शिरले आणि अचानक आठवली ती ही गज़ल! अरेच्चा! इतके दिवस आपल्याला ही गज़ल शोधायचं कसं नाही सुचलं? मनात येताक्षणी मी गुगलोबांना कामाला लावलं आणि पुढच्या पाच मिनिटांत मी ती गज़ल माझ्या laptop वर download केली होती! जेव्हा पहिल्यांदा ऐकली तेव्हा डोळ्यांतून साऱ्या आठवणी दाटल्या!

गेले दोन/तीन दिवस माझ्या ipod वर हीच गज़ल वाजते आहे! “ये आँखोंकी स्याही ये होठोंका उजालापेक्षा ये होठोंकी स्याही ये आंखोंका उजालाकसं जास्ती अर्थपूर्ण वाटतं या निरर्थक वादात मनाला अडकवता मी आता केवळ आनंदासाठी ही गज़ल ऐकतेय!

अशी आहे या गज़लेची गोष्ट!..सुफळ पण संपूर्ण नव्हे! कारण इतके दिवस या गज़लेच्या केवळ आठवणी माझ्यासोबत होत्या पण आता आहे ती गज़ल आणि काही स्वप्नं..या गज़लेच्या साथीनेच खरी व्हावीत अशी!