Wednesday, March 13, 2013

भूले – बिसरे गीत आणि निरमा


वृत्तपत्रांमधून येणारे लेख हे समाजाचं प्रतिबिंब असतात. आपल्याकडल्या आघाडीच्या वृत्तपत्रांमधल्या लेखांकडे एक नजर टाकली तरी एक गोष्ट ठळकपणे नजरेत भरते, ती म्हणजे तुलना! तुलना: दोन प्रकारची. एक म्हणजे आज आणि काल मधली तुलना (आमच्यावेळी असं नव्हतं सिंड्रोम). आपल्याकडे एकुणातच नॉस्टॅल्जिया आवडत असल्याने बालपणीच्या आठवणी, मराठी/हिंदी संगीतातले सुवर्णयुग, आजची बहकलेली पिढी इ. स्टाईलचे लिखाण फार लोकप्रिय आहे. ह्या नॉस्टॅल्जियापायी आपण बरेचदा वर्तमानात जगत नाही. भूतकाळाकडे तटस्थ दृष्टीने बघून त्यातल्या चुकांमधून शिकू शकत नाही. शिवाय अनेक गोष्टींचा नको तेवढा जाज्वल्य अभिमान बाळगतो आणि वर्तमान आणि भविष्य दोन्ही बिघडवतो! नॉस्टॅल्जिक होणं, भूतकाळात रमणं हा पलायनवादाचा उत्कृष्ट नमुना आहे. जी लोकं प्रगती करतात ती “आज”मध्ये जगतात आणि उद्याकडे आशेने बघतात. जरा विचार केला तर भारताविषयी अभिमान वाटायला लावणाऱ्या बहुतांश गोष्टी ह्या भूतकाळातल्या आहेत! भारतीय अध्यात्म, योग, ताजमहाल, अजिंठा, वेरूळ, कोणार्क, अभिजात संगीत इ.इ. आजच्या पिढीने (स्वातंत्र्योत्तर भारतातल्या) असे काय अभिमानास्पद घडवले आहे? किंवा जी प्रगती केली आहे/होते आहे त्याचा आपल्याला पुरेसा अभिमान का वाटत नाही? सतत निराशेचा सूर का निघतो? कारण आजही आपल्याला आपल्या भूतकाळाच्या ओझ्याने पार जखडून टाकले आहे! त्या ओझ्यापायी आपण “आज”मध्ये जगू शकत नाही आणि मग जीवास बरे वाटावे म्हणून आठवणींचा आधार घेत राहतो. आणि एका दुष्टचक्राचा भाग होतो.
दुसऱ्या प्रकारची आवडती तुलना म्हणजे भारताची उर्वरीत जगाशी. तीदेखील आपल्यापेक्षा अधिक विकसित असलेल्या देशांशी. सिंगापूरमध्ये लोकपाल आहे म्हणून एवढी शिस्त आहे. अरब देशांमध्ये चोरांना फटक्यांची/हातपाय तोडण्याची शिक्षा होते म्हणून कोणी चोरी करत नाही. अमेरिकेत वाहतुकीचे नियम कडक आहेत म्हणून...इ. इ.. सतत दुसऱ्यांच्या रोल मॉडेलवर आमच्या विकासाचे मोजमाप करायचे! असे का?
कसाबला फाशीची शिक्षा झाली. लगेच प्रत्येक देशातल्या फाशीच्या कायद्यांवर लेख! आपल्या भारतीय संविधानामध्ये यासंबंधी काय तरतुदी आहेत, त्या का आहेत, त्यात असल्या तर कोणत्या त्रुटी आहेत आणि त्या कशा दूर करता येतील याविषयीचा एखादा लेख कोणाच्या वाचनात आला असेल तर मला जरूर कळवा. मात्र तो अपवादाने नियम सिद्ध करणारा असेल असे वाटते. माझ्यामते याची दोन करणे आहेत. एक म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असलेलं माहितीचं महाजाल! मात्र या महाजालावर “भारतीय” असं किती असतं? जवळपास शून्य! मग बाकी सर्व विकसित देशांनी त्यांच्याकडले कायदे, नियम, तरतुदी ह्याविषयीचे केलेले documentation एका क्लिकवर उपलब्ध असताना कोण जाऊन ते किचकट भारतीय संविधान वाचेल?
आणि दुसरं महत्वाचे आणि मूळ कारण म्हणजे आपली मानसिकता! का सतत परप्रकाशी विचार करत जगतो आपण? आपल्याला भारतीय म्हणून स्वयंप्रकाशी होण्याची गरज आहे. भारतीयांची (पक्षी: आपली) मानसिकता बदलायला हवी आहे.
अमेरिकेत जरा कुठे खुट्टं झालं की आपल्याकडे लगेच बातमी होते! का? काय गरज आहे? अमेरिका आणि भारत म्हणजे टोकाच्या मानसिकता असलेले देश आहेत. इकडे सामान्य अमेरिकन माणसाला अमेरिकेच्या पलीकडचे जग कसे जगते, काय विचार करते याची पडलेली नसते आणि तिकडे सामान्य भारतीय माणूस विकसित देशातल्या सुखसोयी आणि गमतीजमती पाहून न्यूनगंडाने पछाडून जातो. आणि “आपण कधीही सुधारणार नाही” ह्या ठाम समजुतीखाली जगत राहतो. (हे मात्र अगदी खरे आहे. जर याच मानासिकतेने जगत राहिलो तर आपण कधीच सुधारणार नाही!)
कधी कधी वाटते! जरा काही काळ बाकीच्या जगाशी आपला संपर्क तुटू दे. भारतीयांना केवळ अन् केवळ भारतच दिसू दे. आणि तोदेखील केवळ भूतकाळात रममाण होणारा नव्हे तर आपल्या भूतकाळाची जाणीव ठेवून, वर्तमानात जगत, भविष्याची स्वप्नं पाहणारा भारत! इतर देशांसाठी Indian standard हे स्वतःच्या तुलनेत सर्वोत्तम ठरू दे. यासाठी आपल्याला भूले-बिसरे गीत आठवताना आजच्या गाण्यांचा आणि उद्याच्या संगीताचा विसर न पडो आणि “भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद क्यों? यापेक्षा “मुझे कैसी कमीज चाहिये? और मेरी कमीज वैसी क्यूं नहीं?” असा प्रश्न पडो!
अवांतर: पु.लं. तुमची फार आठवण येते! अगदी पदोपदी! आमच्यावेळी हे असं नव्हतं! किंवा, मग आमच्या पेशवे पार्कातली फुलं काय कुरूप असतात काय? किंवा, टिळक पुण्यतिथीला आगरकरांचा जाज्वल्य अभिमान! ‘मोडेन पण वाकणार नाही’ असा वेडपट अभिमान बाळगणाऱ्या मराठी माणसाची दुखरी नस तुम्ही बरोब्बर हेरलीत आणि त्यावर आपल्या नर्मविनोदी शैलीत हळुवार फुंकर घातलीत! तुमच्या विनोदाला आम्ही थोडं सिरियसली घ्यायला हवं असं वाटतं कधी कधी!
अतिअवांतर: माझे पीएचडीचे गाईड म्हणतात Graduate life will make you like a steel which can bend but will never break!
१० मार्च २०१३ 

Tuesday, January 1, 2013

अशास्त्रीय प्रयोग!

काही लोकं आरामात सगळं देवाच्या भरवश्यावर सोडून मोकळी होतात! मला हे असं १००% देवावर/दैवावर विश्वास टाकणं जमत नाही. थोड्या तर्काबुद्धीने विचार करणाऱ्यांची देवभोळ्या जगात पंचाईत होते. देव सर्व काही ठीक करेल हा विचार छान soothing असला तरी आत कुठेतरी पक्कं माहिती असतं की आपण हातपाय हलवले नाहीत तर काहीही होणार नाहीये!
आयुष्य हे अशास्त्रीय प्रयोगाचं एक उत्तम उदाहरण आहे! कारण ह्यात कधीच positive control असत नाही आणि negative control ठेवता येत नाही!
' प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' मधलं गाणं एकदम apt वाटतं कधी कधी!
ह्या रस्त्यावर चालत असता वाटत राही
त्या रस्त्याने गेलो असतो असेच काही
दुविधा इथली अजून काही संपत नाही!

1 January 2013

ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिस याने आपले तत्वज्ञान छोट्या छोट्या तत्वांच्या स्वरूपात मांडून ठेवले आहे. पूर्वीच्या काळी आपल्याकडे संतदेखील होणारे दृष्टांत मांडून ठेवत असत. आपल्याला देखील कधी कधी वाटतं की हे कुठेतरी नोंदवायला हवं. तेव्हा मनात ही कल्पना आहे की मी देखील ह्या वर्षीपासून हे असे दृष्टांत लिहून ठेवणार आहे. ह्या अशा युरेका moments च आपले growth points असतात. येत्या वर्षात अशा अनेक eureka moments आयुष्यात येवोत आणि त्या लिहूनही ठेवल्या जावोत!

वास!

भारतात सुट्टीवर आल्यावर at the back of the mind एक प्रश्न सतत वाजत असतो: इथे असं काय आहे जे अमेरिकेत नाही? थोडं अवांतर वाटेल पण या सुट्टीत विजया मेहतांचं झिम्मा वाचत होते. त्यात नाटकातून प्रेक्षकांपर्यंत कशा आणि किती प्रकारे पोहोचता येतं ह्याचा  त्यांनी घेतलेला शोध मांडला आहे. नाटक ही मुख्यत: दृक-श्राव्य करमणूक आहे. म्हणजे प्रेक्षक आपले कान आणि डोळे ह्या दोनच इंद्रियांचा वापर करत असतो. आणि मधेच कुठेतरी विजया बाईंनी एका नाटकात वातावरण निर्मिती साठी धूप/अगरबत्ती जाळल्याचा उल्लेख केला आहे. शिवाय म्हणे बालगंधर्व त्यांच्या प्रेक्षकांसाठी अत्तरदाणी ठेवायचे, स्वत: उंची अत्तरं वापरायचे. त्याक्षणी एकदम मला युरेका म्हणावसं वाटलं! वास! गंध! आपलं नाक देखील आपल्याला भोवतालच्या जगाबद्दल ज्ञान देत असतंच की!
आणि भारत हा अत्यंत गंधित देश आहे! दोन्ही सुगंध आणि दुर्गंध इथे सुखाने नांदतात!सध्या घरामागच्या building मध्ये एक ओली बाळंतीण आहे. सकाळी सकाळी तिच्यासाठी केलेल्या धुरीचा वास brush करत असताना गच्चीत रेंगाळतो. मग स्वैपाकघरातून दरवळणारे विविध पदार्थांचे वास, रस्त्यावरून जाताना येणारे फळांचे, भाज्यांचे, गाडीवरच्या पदार्थांचे वास.
कुठल्याश्या घरासमोरून जाताना बागेत फुललेल्या फुलांचे सुवास!आणि हो गटाराच्या घाणीचा /कचराकुंडीचा/ मुतारीचा दुर्गंध देखील :(  त्या मानाने अमेरिका अगदीच sterile!
ह्या साऱ्या गंधित विचारांतून मला सुचलेली कल्पना म्हणजे एखाद्या नाटकाच्या प्रयोगात गंधाचा वापर! म्हणजे समजा पाऊस पडतो आहे आणि सभागृहात ओल्या मातीचा सुवास पसरला. किंवा तिने मोगऱ्याचा गजरा माळला आहे आणि प्रेक्षकांना त्याचा सुगंध येतो आहे! It'll really spice up the show नाही का?

Sunday, January 3, 2010

Reflections!

सरत्या वर्षाला निरोप देताना मनात अनेक आठवणी दाटल्या आहेत..त्यांचा हा पट...जसा मनात उलगडत गेला तसा..


आमच्या घराशेजारीच ऑस्टिन मधलं एक मोठं हॉस्पिटल आहे, सेंट डेव्हिड्स नावाचं. तिथे दिवसरात्र वर्दळ सुरु असते, ambulance , मालवाहू ट्रक आणि कंटेनर्स ची. त्यापलीकडूनच IH ३५ नावाचा हायवे जातो. या सगळ्यामुळे आमच्या आसपास सतत जाग असते. Ambulance चे sirens, ट्रकचे reversing horns आणि indicators आणि हो हॉस्पिटल च्या टेरेस वर एक halipad देखील आहे त्यामुळे बऱ्याचदा emergency cases घेऊन helicopter तिथे land होते त्याचाही आवाज. मला सतत प्रश्न पडायचा : हे कसं चालतं? म्हणजे हॉस्पिटल मधल्या patients ना या ध्वनी प्रदूषणाचा त्रास कसा होत नाही? काही दिवसांपूर्वी माझ्या एका would be डॉक्टर मैत्रिणीला विचारलं तर ती म्हणाली "अगं! इथली हॉस्पिटल्स sound proof असतात! घ्या!

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जगी सर्व सुखी असा कोण आहे? असा एक अवघड प्रश्न रामदासांनी साऱ्या जगाला कधीचा विचारून ठेवला आहे! या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेलो तर "आपण तर नाही बा! असेल कोणीतरी" किंवा "ह्या कोणीच नाही!" असे पर्याय आपल्या डोक्यात तरळून जातात! पण काही क्षणांसाठी का होईना या प्रश्नाला "मी" असे उत्तर द्यावेसे वाटते! To be precise "मी cheesecake खाताना!" cheesecake हा एका प्रकारचा केक आहे या पलीकडे या खाद्यप्रकाराचे वर्णन करण्यात फारसा अर्थ नाही कारण तो खाऊनच पाहीला पाहिजे अशा category तला पदार्थ आहे! इथे cheesecake factory नावाचे केवळ cheesecakes साठी प्रसिद्ध असे दुकान आहे तिथला चीजकेक सर्वात भारी! अजून एक गोष्ट म्हणजे चीजकेक जसा शिळा होतो तशी त्याची चव अधिक चांगली होत जाते असा आमचा अनुभव आहे! आपली पुरणपोळी कशी तसा. अहाहा! आता यापुढे फार लिहित नाही! एक बार खाओगे तो तुम भी कहोगे..जगी सर्व सुखी असा/अशी मीच! लागली बेट!

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आपल्याकडे ज्याला graduation म्हणतात त्या शिक्षणाला अमेरिकेमध्ये undergraduate studies म्हणतात. मी मागच्या एका मेल मध्ये मला teaching assistant म्हणून काम करताना आलेले काही अनुभव लिहिले होते. त्यात यावर्षी अजून भर पडली. इथे undergraduation करणाऱ्या मुलांबद्दल माझा कौतुकादर वाढला आहे! याचं महत्वाचं कारण म्हणजे इथल्या शिक्षण पद्धतीत मुलांना फार pro-active असावं लागतं. आपल्याकडे एकदा डिग्री कॉलेज ला admission घेतली की विद्यार्थ्यांनी वेळेवर आपापल्या वर्गात किंवा lab मध्ये पोचले की झाले. विविध विषयांचे शिक्षक स्वत: वर्गात येऊन शिकवून जातात. शिवाय मी या वर्षी कोणते विषय शिकू? असा कधी प्रश्न पडत नाही. एकदा का specialization कोणते हे ठरले की दरवर्षी ठरलेले विषय आपण घेत जातो. University एकत्रित सर्व विषयांच्या परीक्षा घेते व निकाल लावते. या उलट इथे असंख्य पर्याय उपलब्ध असल्यामुळे साचेबंद अभ्यासक्रम नसतो. प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे आणि वेळ असेल तसे courses घेतो. एकदा register केल्यावर त्या course चे lecture जिथे होणार असेल तिथे पोचण्याची जबाबदारी विद्यार्थावर असते. प्रत्येक course च्या त्या शिक्षकाने आखलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा होतात. त्यामुळे एका दिवशी दोन विषयांची परीक्षा असू शकते. एका lecture नंतर होणारे दुसरे lecture हे university च्या पार दुसऱ्या टोकाला असणाऱ्या इमारतीत असू शकते. त्यामुळे इथे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला जागरूक असावे लागते. pro-active असावे लागते. या साऱ्या गोष्टी Fall semester मध्ये TA म्हणून काम करताना नव्याने जाणवलेल्या!

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इथे आल्यापासून माझा एका गोष्टीचा count up सुरु झाला आहे तो म्हणजे "याची देही याची डोळा किती nobel laureates ना पाहिलं आणि ऐकलं" याचा. आत्तापर्यंतचा score आहे तीन. पैकी दोन हे medicine मधले Nobel विजेते आहेत. मला खास करून सांगावेसे वाटते ते तिसऱ्या व्यक्तीबद्दल आणि ती व्यक्ती म्हणजे नोबेल पीस प्राईज विजेत्या इराणच्या स्त्री मुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या शिरीन इबादी. UT च्या Iranian studies center तर्फे त्यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते त्याला मी गेले होते. (ही मे मधली गोष्ट आहे कारण सध्या त्यांना इराण सरकार ने अटक केली आहे.) भाषणाला बरीच गर्दी होती. आम्हाला उशीर झाल्यामुळे मुख्य सभागृहामध्ये बसता आला नाही. शेजारच्या एका conference room मध्ये प्रोजेक्टर लावून लोकांची सोय केली होती तिथे बसावे लागले. त्या भाषणाला उभ्या राहिल्या आणि आश्चर्याचा पाहिलं धक्का बसला..त्यांनी चक्क इराणी भाषेतून बोलायला सुरुवात केली! एक मुलगी त्यांच्या प्रत्येक वाक्याचं इंग्रजी भाषांतर करीत होती. त्यांने साधारण एक अर्धा पाऊण तास भाषण केले. त्यात जाता जाता अमेरिकन सरकार ला कोपरखळ्या देखील मारल्या! इराण मधील एकूण परिस्थिती आणि त्याला जबाबदार असलेली सरकारी धोरणं यावर कडाडून टीका केली. त्यांच्या काही वाक्यांना भाषांतरापुर्वीच हशा आणि टाळ्या मिळत होते त्यावरून दोन्ही सभागृहात इराणी जाणणाऱ्या लोकांची संख्या बर्यापैकी होती असं जाणवलं! त्या नंतर प्रश्नोत्तरे झाली. त्यात एका श्रोत्याने : तुम्ही एवढ्या प्रसिद्ध असल्यामुळे तुम्ही इराण सरकार वर अशी मोकळेपणी टीका करू शकता..सरकार तुम्हाला काही जेल मध्ये टाकणार नाही मात्र सर्वसामान्य जनतेने कसे करावे?" असा प्रश्न विचारलं. त्यावर त्यांनी सुरुवातीला च "तुम्ही मला अटक होणार नाही अशी इच्छा व्यक्त केलीत त्याबद्दल मी तुमची आभारी आहे!" असे म्हणाल्यावर लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला! (आणि खरोखरीच आज त्या जेल मध्ये आहेत!). प्रश्नोत्तरे संपली, आभार प्रदर्शन झाले आणि लोक जाऊ लागले. मी म्हटलं " moniter वर पाहून उपयोग नाही आपण मुख्य सभागृहात जाऊन त्यांना प्रत्यक्ष पाहिलंच पाहिजे असा विचार करत मी hall च्या दारात उभी असताना अचानक लोकांचा गलका झाला आणि बघते तो माझ्या समोर अगदी हाताच्या अंतरावर प्रत्यक्ष शिरीन इबादी येऊन उभ्या! पाहिलं आणि आश्चर्याचा दुसरा धक्का बसला! त्या तर उंचीने माझ्यापेक्षाही बुटक्या होत्या! प्रसन्न आणि तेजस्वी चेहरा आणि त्यावर गोड हसू! पाहूनच मस्त वाटलं! जेव्हा त्यांना कळलं की शेजारच्या सभागृहामध्ये देखील काही श्रोते बसले आहेत तेव्हा त्यांना भेटायला म्हणून त्या लगेच आमच्या इथे आल्या!

त्यांनी आमचे सर्वांचे आभार मानले! खूप सारे जण त्यांच्याशी हस्तांदोलन करत होते, इराणी भाषेतून संवाद साधत होते. तेवढ्यात मी पाहिले की एक अमेरिकन बाई त्यांच्यापाशी आली.तिच्या चेहऱ्यावरून तिला बरेच सांगायचे आहे असे वाटत होते पण भाषेचा अडसर होता! आणि मग त्या सहा फुट उंच बाईने पावणेपाच फूट उंच शिरीन इबादींची केवळ पाठ थोपटली! आणि शिरीन इबादींनी देखील "शब्दावाचून कळले सारे" अशी नजरेतून पावती दिली! माझ्या तर डोळ्यात पाणीच आले! एका वेगळ्याच enlightened mood मध्ये मी ती संध्याकाळ घालवली!

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कुठल्याही लहान मुलाच्या आजूबाजूला जी भाषा बोलली जाते ती भाषा ते मूल आपोआप शिकत जातं. पण हे असं मोठेपणी देखील शक्य असेल तर एक दोन वर्षात मला चीनी भाषा यायला काहीच हरकत नाही! कारण lab मध्ये काम करत असताना सतत तीच भाषा कानी पडत असते! अमेरिकेत येऊन माझ्या चीन विषयीच्या ज्ञानात एवढी भर पडेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं! चीनी किंवा कोरिअन लोक जन्मलेल्या बाळाचं वय एक वर्ष मानून त्यापुढे वय मोजायला सुरुवात करतात! ही इंटरेस्टिंग गोष्ट मला इथे येऊनच कळली! सध्याच्या चीन सरकार ने शाळांमधून "जगात देव नाही " असं शिकवल्यामुळे नवीन चीनी पिढी ही कोणताही देव/ धर्म मानत नाही! I found it very difficult to believe that they actually don't believe in anything! मला जेव्हा आमच्या lab मधल्या post doc नी हे सांगितलं तेव्हा मी मनात सहज एक कल्पना केली..जर असं भारतात झालं तर?!!..आपल्यापैकी प्रत्येकाला वेगळं काहीतरी करण्यासाठी २/३ महिने सहज मिळतील! काहीजण तर बेकार ही होतील कदाचित! इतकं आपलं जीवन "देव" या संकल्पनेशी जोडलं गेलं आहे! पण मग जीवन निरस देखील होईल हे पण तितकंच खरं!

मात्र माझ्या अजून एका चीनी सहकाऱ्याने मला हे आवर्जून सांगितले की बीजिंग, शांघाय म्हणजे चीन नव्हे! या शहरांकडे पाहून जितका वाटतो तितका चीन अजून विकसित झाला नाहीये. China is still developing. आणि भारताप्रमाणेच तिथे ही आर्थिक विषमता आहे मात्र सरकारच्या कडक बंधनांमुळे साऱ्या गोष्टी जगापुढे येऊ शकत नाहीत! चीनी लोकांना देखील भारताविषयी प्रचंड कुतूहल असतं! एकदा Ling ने मला डबा खाताना विचारले "भारतीय लोकांमध्ये शाकाहारी लोकांचे प्रमाण किती?" मी म्हटलं, "तसं सांगणं अवघड आहे पण ५०% तरी नक्की असेल. पण nonveg खाणारे भारतीय देखील सहसा pork, ham किंवा beef खात नाहीत." आणि मग तिचा पुढचा प्रश्न आला..."मग इंडिया मध्ये pigs नसतीलच ना?!!!"....मी महत्प्रयासांनी हसू आवरलं! म्हटलं "असंच काही नाही..आहेत ना इंडियात pigs!"

"पण मग काय करता तुम्ही त्यांचं?" पुढचा प्रश्न!! आता माझी खरी पंचाईत झाली! भारतात डुक्कर कोणी खात नाही तर मग भारतात डुक्करं आहेत तरी कशासाठी!.."Well, मी तिला म्हटलं We don't rear pigs you know but you do find some stray pigs around the marketplaces!" अजून काय सांगू! मनात म्हटलं भारतातली डुक्करं कशी असतात ते बघितलस तर जन्मात पुन्हा कधी pork खाणार नाहीस!

असो!! तर तुम्हा सर्वांना (थोड्या उशिरा का होईना) नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!! हे वर्ष सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारे ठरो हीच ईश्वर चरणी प्रार्थना! Happy new year!!