Wednesday, March 13, 2013

भूले – बिसरे गीत आणि निरमा


वृत्तपत्रांमधून येणारे लेख हे समाजाचं प्रतिबिंब असतात. आपल्याकडल्या आघाडीच्या वृत्तपत्रांमधल्या लेखांकडे एक नजर टाकली तरी एक गोष्ट ठळकपणे नजरेत भरते, ती म्हणजे तुलना! तुलना: दोन प्रकारची. एक म्हणजे आज आणि काल मधली तुलना (आमच्यावेळी असं नव्हतं सिंड्रोम). आपल्याकडे एकुणातच नॉस्टॅल्जिया आवडत असल्याने बालपणीच्या आठवणी, मराठी/हिंदी संगीतातले सुवर्णयुग, आजची बहकलेली पिढी इ. स्टाईलचे लिखाण फार लोकप्रिय आहे. ह्या नॉस्टॅल्जियापायी आपण बरेचदा वर्तमानात जगत नाही. भूतकाळाकडे तटस्थ दृष्टीने बघून त्यातल्या चुकांमधून शिकू शकत नाही. शिवाय अनेक गोष्टींचा नको तेवढा जाज्वल्य अभिमान बाळगतो आणि वर्तमान आणि भविष्य दोन्ही बिघडवतो! नॉस्टॅल्जिक होणं, भूतकाळात रमणं हा पलायनवादाचा उत्कृष्ट नमुना आहे. जी लोकं प्रगती करतात ती “आज”मध्ये जगतात आणि उद्याकडे आशेने बघतात. जरा विचार केला तर भारताविषयी अभिमान वाटायला लावणाऱ्या बहुतांश गोष्टी ह्या भूतकाळातल्या आहेत! भारतीय अध्यात्म, योग, ताजमहाल, अजिंठा, वेरूळ, कोणार्क, अभिजात संगीत इ.इ. आजच्या पिढीने (स्वातंत्र्योत्तर भारतातल्या) असे काय अभिमानास्पद घडवले आहे? किंवा जी प्रगती केली आहे/होते आहे त्याचा आपल्याला पुरेसा अभिमान का वाटत नाही? सतत निराशेचा सूर का निघतो? कारण आजही आपल्याला आपल्या भूतकाळाच्या ओझ्याने पार जखडून टाकले आहे! त्या ओझ्यापायी आपण “आज”मध्ये जगू शकत नाही आणि मग जीवास बरे वाटावे म्हणून आठवणींचा आधार घेत राहतो. आणि एका दुष्टचक्राचा भाग होतो.
दुसऱ्या प्रकारची आवडती तुलना म्हणजे भारताची उर्वरीत जगाशी. तीदेखील आपल्यापेक्षा अधिक विकसित असलेल्या देशांशी. सिंगापूरमध्ये लोकपाल आहे म्हणून एवढी शिस्त आहे. अरब देशांमध्ये चोरांना फटक्यांची/हातपाय तोडण्याची शिक्षा होते म्हणून कोणी चोरी करत नाही. अमेरिकेत वाहतुकीचे नियम कडक आहेत म्हणून...इ. इ.. सतत दुसऱ्यांच्या रोल मॉडेलवर आमच्या विकासाचे मोजमाप करायचे! असे का?
कसाबला फाशीची शिक्षा झाली. लगेच प्रत्येक देशातल्या फाशीच्या कायद्यांवर लेख! आपल्या भारतीय संविधानामध्ये यासंबंधी काय तरतुदी आहेत, त्या का आहेत, त्यात असल्या तर कोणत्या त्रुटी आहेत आणि त्या कशा दूर करता येतील याविषयीचा एखादा लेख कोणाच्या वाचनात आला असेल तर मला जरूर कळवा. मात्र तो अपवादाने नियम सिद्ध करणारा असेल असे वाटते. माझ्यामते याची दोन करणे आहेत. एक म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असलेलं माहितीचं महाजाल! मात्र या महाजालावर “भारतीय” असं किती असतं? जवळपास शून्य! मग बाकी सर्व विकसित देशांनी त्यांच्याकडले कायदे, नियम, तरतुदी ह्याविषयीचे केलेले documentation एका क्लिकवर उपलब्ध असताना कोण जाऊन ते किचकट भारतीय संविधान वाचेल?
आणि दुसरं महत्वाचे आणि मूळ कारण म्हणजे आपली मानसिकता! का सतत परप्रकाशी विचार करत जगतो आपण? आपल्याला भारतीय म्हणून स्वयंप्रकाशी होण्याची गरज आहे. भारतीयांची (पक्षी: आपली) मानसिकता बदलायला हवी आहे.
अमेरिकेत जरा कुठे खुट्टं झालं की आपल्याकडे लगेच बातमी होते! का? काय गरज आहे? अमेरिका आणि भारत म्हणजे टोकाच्या मानसिकता असलेले देश आहेत. इकडे सामान्य अमेरिकन माणसाला अमेरिकेच्या पलीकडचे जग कसे जगते, काय विचार करते याची पडलेली नसते आणि तिकडे सामान्य भारतीय माणूस विकसित देशातल्या सुखसोयी आणि गमतीजमती पाहून न्यूनगंडाने पछाडून जातो. आणि “आपण कधीही सुधारणार नाही” ह्या ठाम समजुतीखाली जगत राहतो. (हे मात्र अगदी खरे आहे. जर याच मानासिकतेने जगत राहिलो तर आपण कधीच सुधारणार नाही!)
कधी कधी वाटते! जरा काही काळ बाकीच्या जगाशी आपला संपर्क तुटू दे. भारतीयांना केवळ अन् केवळ भारतच दिसू दे. आणि तोदेखील केवळ भूतकाळात रममाण होणारा नव्हे तर आपल्या भूतकाळाची जाणीव ठेवून, वर्तमानात जगत, भविष्याची स्वप्नं पाहणारा भारत! इतर देशांसाठी Indian standard हे स्वतःच्या तुलनेत सर्वोत्तम ठरू दे. यासाठी आपल्याला भूले-बिसरे गीत आठवताना आजच्या गाण्यांचा आणि उद्याच्या संगीताचा विसर न पडो आणि “भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद क्यों? यापेक्षा “मुझे कैसी कमीज चाहिये? और मेरी कमीज वैसी क्यूं नहीं?” असा प्रश्न पडो!
अवांतर: पु.लं. तुमची फार आठवण येते! अगदी पदोपदी! आमच्यावेळी हे असं नव्हतं! किंवा, मग आमच्या पेशवे पार्कातली फुलं काय कुरूप असतात काय? किंवा, टिळक पुण्यतिथीला आगरकरांचा जाज्वल्य अभिमान! ‘मोडेन पण वाकणार नाही’ असा वेडपट अभिमान बाळगणाऱ्या मराठी माणसाची दुखरी नस तुम्ही बरोब्बर हेरलीत आणि त्यावर आपल्या नर्मविनोदी शैलीत हळुवार फुंकर घातलीत! तुमच्या विनोदाला आम्ही थोडं सिरियसली घ्यायला हवं असं वाटतं कधी कधी!
अतिअवांतर: माझे पीएचडीचे गाईड म्हणतात Graduate life will make you like a steel which can bend but will never break!
१० मार्च २०१३ 

No comments:

Post a Comment