Friday, August 9, 2013

सगळ्यात अवघड गड!

आमच्या दहावीच्या अभ्यास शिबिरात खूप छान छान व्याख्यानं झाली. एका संध्याकाळी व्याख्यानाला वेळ होता म्हणून आम्ही ५-६ जणी शाळेशेजारी आमच्या नेहमीच्या ठिकाणी गप्पा मारत उभ्या होतो. एक मध्यम वयाचे गृहस्थ तिथे सायकलवरून आले आणि त्यांनी काहीतरी विचारलं, बहुदा सायकल कुठे लावू की असंच काहीतरी. आम्ही त्यांना उत्तर दिलं आणि पुन्हा गप्पांत दंग झालो. आता आम्हाला काय माहिती की आपले आजचे प्रमुख पाहुणे सायकलवरून येणार आहेत म्हणून!
ते प्रमुख पाहुणे होते प्रा.प्र. के. घाणेकर! त्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात केलेल्या भटकंतीवर गप्पामारल्या. व्याख्यान खुपच रंगलं. प्रश्नोत्तरांच्या वेळी त्यांना कुणीतरी विचारलं, " सर, तुम्ही इतके गड किल्ले सर केले आहेत. तर त्यातला सगळ्यात अवघड किल्ला कुठला होता?" त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर अजून माझ्या मनात रुतून बसलं आहे. ते म्हणाले, "खरं सांगू का? सगळ्यांत अवघड गड असतो तो उंबरठा गड! म्हणजे तुमच्या घराचा उंबरठा! एकदा तुम्ही तो पार करून बाहेर पडलात ना की मग कोणताही गड अवघड रहात नाही!" त्यावेळी ते उत्तर ऐकून मज्जा वाटली होती. पण आता जाणवतं की हे किती खरं आहे ते!
आता वाटतं की तो घराचा उंबरठा देखील प्रतीकच असतो. ओलांडण्यासाठी सर्वात अवघड असतो तो मनाचा उंबरठा! आपले पूर्वानुभव, इतरांचे सल्ले आणि समाज रुढी यांनी बनलेला. हे उंबरठे आपल्या मनात आपणच आपल्या नकळत उभारत असतो. ते जाणीवपूर्वक टाळलं पाहिजे. आणि तो मनाचा उंबरठा एकदा ओलांडला ना की मग पल्याडची न्यारी दुनिया आपली वाटच बघत असते!

Thursday, August 8, 2013

वादे वादे!

ह्या अनुभवाबद्दल मला बरेच दिवस लिहायचंच होतं. स्वतःची ठाम मते असलेली (opinionated) दोन माणसं जेव्हा संवाद साधतात तेव्हा काय होतं? मी स्वतः या कॅटॅगरीत मोडत असल्याने ह्या प्रसंगांचा मला बराच अनुभव आहे. या साऱ्या अनुभवांत काहीतरी समानता आहे हे मला जाणवत होतं पण ते नक्की काय हे उमजायला जरा वेळ लागला. तर हा शोध काय आहे ते मला सांगितलंच पाहिजे कारण तो इंटरेस्टिंग आहे आणि उपयोगीदेखील!
बरेचदा कसं असतं की कोणत्याही गोष्टीला दोन (वा अधिक) बाजू असतात आणि कोणतीही एक बाजू संपूर्णपणे चूक किंवा बरोबर असत नाही. परिस्थितीप्रमाणे किंवा व्यक्तीसापेक्ष योग्य बाजू बदलत असते. किंवा बरेचदा तो एक choice असतो. म्हणजे कधी कधी  I could have gone either way but I could choose only one so I chose this इतका सोपा. पण समजा त्या निर्णयावर किंवा अशा एखादया subjective विषयावर (उदा. लिव्ह इन रिलेशनशिप) दोन opinionated व्यक्ती बोलू लागल्या की काय होतं? मी सांगते! त्यांचं फार कमी वेळा एकमत होतं! कारण जर एका व्यक्तीने एक बाजू उचलून धरली तर दुसऱ्या व्यक्तीला बरेचदा दुसरी बाजू उचलून धरण्याची खुमखुमी येते! (मला येते! खोटं का बोला!) दोन्ही बाजूंना आपापले pros and cons असतातच ! (बरेचसे मुद्दे दोघांना माहिती असले तरी) त्यामुळे थोडा काळ वाद होतो आणि गाडी एका नेहमीच्या वळणावर येऊन थांबते. आता depending on the situation and subject ह्यात बरीच variations होऊ शकतात पण pattern फारसा बदलत नाही.
'वादे वादे जायते तत्वबोध:' हे जरी खरं असलं तरी अनेक वेळा ह्या वादांतून वेळेच्या आणि उर्जेच्या अपव्ययाखेरीज काही हाती लागत नाही. बरेचदा हे वाद घालणाऱ्या व्यक्ती पुरेशा सुज्ञ आणि विचारी असतात त्यामुळे दुसरी बाजू त्यांनाही व्यवस्थित दिसत असतेच! (आणि जर कोणी एक डोळ्यावर झापडं बांधून वाद घालत असेल तर सारंच व्यर्थ आहे!). मात्र एकप्रकारचं killer instinct त्यांना वाद घालण्यापासून थांबवू शकत नाही!
ह्यात अजून एक इंटरेस्टिंग underlying प्रक्रिया असते! आपण पत्त्यांत challenge खेळतो तेव्हा जो शेवटी पत्ते लावतो त्याला पुढची उतारी मिळते! या वादांमध्येदेखील ते शेवटचं "और एक" प्रत्येकाला म्हणायचं असतं! To have the last word! जे थोडेफार माझ्या स्वभावात आहे. पण ही गोष्ट चांगली नसते!
वाद घालण्यात एक मजा असते आणि मला वाद घालायला आवडतं. पण  हा pattern लक्षात आल्यापासून काही गोष्टी मी स्वतःपुरत्या तरी follow करण्याचा प्रयत्न करते.
एक,  जरी वाद घालताना आपण एक बाजू मांडली असली तरी वाद संपल्यावर आणि मुख्य म्हणजे डोकं थंड झाल्यावर दुसऱ्याने मांडलेल्या बाजूचा पुन्हा विचार करून पहावा. बरेचदा काहीतरी चांगले हाती लागते!
दोन,  ह्या वादातून फारसे काही निष्पन्न होणार नसल्याचे लक्षात आले की let's agree to disagree म्हणून लगेच वाद मिटवून टाकावा! वेळ पडली तर सपशेल माघार घ्यावी! संबंधात उगीच कटुता येण्याचे chances कमी होतात.
ह्या वाद घालण्याच्या प्रोसेसकडे डोळसपणे पाहायला लागल्यापासून माझी वाद घालण्याची खुमखुमी थोडी कमी झाल्येय आणि (माझी आणि इतरांची) मन:शांती थोडीशी वाढल्येय यात वादच नाही!

Oh my God Moments!

हा माझा अगदी tried and tested अनुभव आहे. कोणत्याही मोठ्या महत्वाच्या गोष्टीत/प्रसंगात काहीतरी न्यून राहतेच (तीट लागल्यासारखे)! सर्व काही ठरल्याप्रमाणे जसे हवे तसे बिनचूक झाले आहे असे होतच नाही. प्रत्येक वेळी एखादी तीट लावण्यापुरती तरी एखादी OMG moment असतेच! त्या मोमेंट ची तीव्रता कमीजास्त असू शकते. ती जब वी मेट मधली रतलाम स्टेशनवर सुटलेल्या ट्रेनकडे आ वासून पाहणारी करीना आठवते? तशी तीव्र किंवा हातिच्चा! एवढंच राहिलं का! एवढी साधी! आत्तापर्यंत ह्या दोन्ही टोकाच्या आणि अधल्यामधल्या सर्व तीव्रतेच्या OMG moments अनुभवल्या आहेत. वाईट्ट वाईट्ट OMG moment म्हणजे एकदा एका फार महत्वाच्या प्रयोगात (ज्याचे निष्कर्ष काल मिळाले असते तर बर इतके urgent होते ) मी हवं असलेलं supernatent चक्क ओतून दिलं होतं!! त्यावेळी ही धरणी फाडून मला पोटात घेईल तर किती बरं असं वाटलं होतं!
आता तर मी अशा OMG moments ची वाटच बघत असते. ती मोमेंट एकदा येउन गेली की हायसं वाटतं मला. म्हणजे त्यावेळी व्हायची ती चूक/गडबड होऊन गेलेली असते. आता फक्त निस्तरणं आपल्या हातात असतं . अशावेळी मी पश्चाताप वै. करत बसत नाही. झालेली चूक निस्तरते आणि आपली थियरी कशी योग्य असं म्हणत स्वतःची पाठ थोपटते!

पुढच्यास ठेच मागचा शहाणा

खरंतर आपल्या म्हणी इतक्या चपखल असतात की त्यांच्या अचूकतेने थक्क व्हायला होतं. फार मोठा आशय किंवा सत्य अत्यंत नेमक्या शब्दात मांडलेलं असतं. उदा. नावडतीचे मीठ अळणी! पण एक म्हण आजकाल मला फार खटकू लागली आहे. ती म्हण आहे : पुढच्यास ठेच मागचा शहाणा. दुसऱ्याच्या ठेचेमुळे शहाणपण शिकलेला एकतरी माणूस दाखवा मला! एवढंच कशाला बरेचदा आपण स्वतःच्या चुकांतून देखील शिकत नहि. मग कशी बर तयार झाली ही म्हण! 

Wednesday, March 13, 2013

भूले – बिसरे गीत आणि निरमा


वृत्तपत्रांमधून येणारे लेख हे समाजाचं प्रतिबिंब असतात. आपल्याकडल्या आघाडीच्या वृत्तपत्रांमधल्या लेखांकडे एक नजर टाकली तरी एक गोष्ट ठळकपणे नजरेत भरते, ती म्हणजे तुलना! तुलना: दोन प्रकारची. एक म्हणजे आज आणि काल मधली तुलना (आमच्यावेळी असं नव्हतं सिंड्रोम). आपल्याकडे एकुणातच नॉस्टॅल्जिया आवडत असल्याने बालपणीच्या आठवणी, मराठी/हिंदी संगीतातले सुवर्णयुग, आजची बहकलेली पिढी इ. स्टाईलचे लिखाण फार लोकप्रिय आहे. ह्या नॉस्टॅल्जियापायी आपण बरेचदा वर्तमानात जगत नाही. भूतकाळाकडे तटस्थ दृष्टीने बघून त्यातल्या चुकांमधून शिकू शकत नाही. शिवाय अनेक गोष्टींचा नको तेवढा जाज्वल्य अभिमान बाळगतो आणि वर्तमान आणि भविष्य दोन्ही बिघडवतो! नॉस्टॅल्जिक होणं, भूतकाळात रमणं हा पलायनवादाचा उत्कृष्ट नमुना आहे. जी लोकं प्रगती करतात ती “आज”मध्ये जगतात आणि उद्याकडे आशेने बघतात. जरा विचार केला तर भारताविषयी अभिमान वाटायला लावणाऱ्या बहुतांश गोष्टी ह्या भूतकाळातल्या आहेत! भारतीय अध्यात्म, योग, ताजमहाल, अजिंठा, वेरूळ, कोणार्क, अभिजात संगीत इ.इ. आजच्या पिढीने (स्वातंत्र्योत्तर भारतातल्या) असे काय अभिमानास्पद घडवले आहे? किंवा जी प्रगती केली आहे/होते आहे त्याचा आपल्याला पुरेसा अभिमान का वाटत नाही? सतत निराशेचा सूर का निघतो? कारण आजही आपल्याला आपल्या भूतकाळाच्या ओझ्याने पार जखडून टाकले आहे! त्या ओझ्यापायी आपण “आज”मध्ये जगू शकत नाही आणि मग जीवास बरे वाटावे म्हणून आठवणींचा आधार घेत राहतो. आणि एका दुष्टचक्राचा भाग होतो.
दुसऱ्या प्रकारची आवडती तुलना म्हणजे भारताची उर्वरीत जगाशी. तीदेखील आपल्यापेक्षा अधिक विकसित असलेल्या देशांशी. सिंगापूरमध्ये लोकपाल आहे म्हणून एवढी शिस्त आहे. अरब देशांमध्ये चोरांना फटक्यांची/हातपाय तोडण्याची शिक्षा होते म्हणून कोणी चोरी करत नाही. अमेरिकेत वाहतुकीचे नियम कडक आहेत म्हणून...इ. इ.. सतत दुसऱ्यांच्या रोल मॉडेलवर आमच्या विकासाचे मोजमाप करायचे! असे का?
कसाबला फाशीची शिक्षा झाली. लगेच प्रत्येक देशातल्या फाशीच्या कायद्यांवर लेख! आपल्या भारतीय संविधानामध्ये यासंबंधी काय तरतुदी आहेत, त्या का आहेत, त्यात असल्या तर कोणत्या त्रुटी आहेत आणि त्या कशा दूर करता येतील याविषयीचा एखादा लेख कोणाच्या वाचनात आला असेल तर मला जरूर कळवा. मात्र तो अपवादाने नियम सिद्ध करणारा असेल असे वाटते. माझ्यामते याची दोन करणे आहेत. एक म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असलेलं माहितीचं महाजाल! मात्र या महाजालावर “भारतीय” असं किती असतं? जवळपास शून्य! मग बाकी सर्व विकसित देशांनी त्यांच्याकडले कायदे, नियम, तरतुदी ह्याविषयीचे केलेले documentation एका क्लिकवर उपलब्ध असताना कोण जाऊन ते किचकट भारतीय संविधान वाचेल?
आणि दुसरं महत्वाचे आणि मूळ कारण म्हणजे आपली मानसिकता! का सतत परप्रकाशी विचार करत जगतो आपण? आपल्याला भारतीय म्हणून स्वयंप्रकाशी होण्याची गरज आहे. भारतीयांची (पक्षी: आपली) मानसिकता बदलायला हवी आहे.
अमेरिकेत जरा कुठे खुट्टं झालं की आपल्याकडे लगेच बातमी होते! का? काय गरज आहे? अमेरिका आणि भारत म्हणजे टोकाच्या मानसिकता असलेले देश आहेत. इकडे सामान्य अमेरिकन माणसाला अमेरिकेच्या पलीकडचे जग कसे जगते, काय विचार करते याची पडलेली नसते आणि तिकडे सामान्य भारतीय माणूस विकसित देशातल्या सुखसोयी आणि गमतीजमती पाहून न्यूनगंडाने पछाडून जातो. आणि “आपण कधीही सुधारणार नाही” ह्या ठाम समजुतीखाली जगत राहतो. (हे मात्र अगदी खरे आहे. जर याच मानासिकतेने जगत राहिलो तर आपण कधीच सुधारणार नाही!)
कधी कधी वाटते! जरा काही काळ बाकीच्या जगाशी आपला संपर्क तुटू दे. भारतीयांना केवळ अन् केवळ भारतच दिसू दे. आणि तोदेखील केवळ भूतकाळात रममाण होणारा नव्हे तर आपल्या भूतकाळाची जाणीव ठेवून, वर्तमानात जगत, भविष्याची स्वप्नं पाहणारा भारत! इतर देशांसाठी Indian standard हे स्वतःच्या तुलनेत सर्वोत्तम ठरू दे. यासाठी आपल्याला भूले-बिसरे गीत आठवताना आजच्या गाण्यांचा आणि उद्याच्या संगीताचा विसर न पडो आणि “भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद क्यों? यापेक्षा “मुझे कैसी कमीज चाहिये? और मेरी कमीज वैसी क्यूं नहीं?” असा प्रश्न पडो!
अवांतर: पु.लं. तुमची फार आठवण येते! अगदी पदोपदी! आमच्यावेळी हे असं नव्हतं! किंवा, मग आमच्या पेशवे पार्कातली फुलं काय कुरूप असतात काय? किंवा, टिळक पुण्यतिथीला आगरकरांचा जाज्वल्य अभिमान! ‘मोडेन पण वाकणार नाही’ असा वेडपट अभिमान बाळगणाऱ्या मराठी माणसाची दुखरी नस तुम्ही बरोब्बर हेरलीत आणि त्यावर आपल्या नर्मविनोदी शैलीत हळुवार फुंकर घातलीत! तुमच्या विनोदाला आम्ही थोडं सिरियसली घ्यायला हवं असं वाटतं कधी कधी!
अतिअवांतर: माझे पीएचडीचे गाईड म्हणतात Graduate life will make you like a steel which can bend but will never break!
१० मार्च २०१३ 

Tuesday, January 1, 2013

अशास्त्रीय प्रयोग!

काही लोकं आरामात सगळं देवाच्या भरवश्यावर सोडून मोकळी होतात! मला हे असं १००% देवावर/दैवावर विश्वास टाकणं जमत नाही. थोड्या तर्काबुद्धीने विचार करणाऱ्यांची देवभोळ्या जगात पंचाईत होते. देव सर्व काही ठीक करेल हा विचार छान soothing असला तरी आत कुठेतरी पक्कं माहिती असतं की आपण हातपाय हलवले नाहीत तर काहीही होणार नाहीये!
आयुष्य हे अशास्त्रीय प्रयोगाचं एक उत्तम उदाहरण आहे! कारण ह्यात कधीच positive control असत नाही आणि negative control ठेवता येत नाही!
' प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' मधलं गाणं एकदम apt वाटतं कधी कधी!
ह्या रस्त्यावर चालत असता वाटत राही
त्या रस्त्याने गेलो असतो असेच काही
दुविधा इथली अजून काही संपत नाही!

1 January 2013

ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिस याने आपले तत्वज्ञान छोट्या छोट्या तत्वांच्या स्वरूपात मांडून ठेवले आहे. पूर्वीच्या काळी आपल्याकडे संतदेखील होणारे दृष्टांत मांडून ठेवत असत. आपल्याला देखील कधी कधी वाटतं की हे कुठेतरी नोंदवायला हवं. तेव्हा मनात ही कल्पना आहे की मी देखील ह्या वर्षीपासून हे असे दृष्टांत लिहून ठेवणार आहे. ह्या अशा युरेका moments च आपले growth points असतात. येत्या वर्षात अशा अनेक eureka moments आयुष्यात येवोत आणि त्या लिहूनही ठेवल्या जावोत!